जिल्ह्यातील शिक्षकांचा उद्या ‘आक्रोश’

कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने उद्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा ‘काढण्यात येणार आहे.

   विनाअनुदानित शाळांच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा ,हायस्कूल व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून सर्व शिक्षकांनी या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या वतीने घेण्यात आला.

    कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान द्यावे तसेच नोव्हेंबर २००५ पूर्वी नेमलेल्या काही शिक्षकांना अध्याप जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही या मागण्यांसंदर्भात कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गेले आठवडाभर आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

   दसरा चौक येथे दुपारी बारा वाजता मोर्चा सुरू होणार आहे. बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, माळकर तिकटी मार्गे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येईल. या मोर्चात जिल्हा शैक्षणिक व्यासपिठचे अध्यक्ष एस.डी. लाड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, शिक्षक नेते दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे, मिलिंद पांगरेकर, भरत रसाळे, आदी सहभागी होणार आहेत.