जास्त पावसाचा विभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या तालुक्यातच पाण्यासाठी वणवण

जावळी: जावळी तालुक्याच्या पश्चिमेला डोंगरपठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढून झऱयांचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे कुसुंबीमुरा येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.जिह्यातील सगळ्यात जास्त पावसाचा विभाग म्हणून ओळखला जाणारा कास परिसर व जावळी तालुक्यातच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

कुसुंबीमुरा येथील 150-200 लोकसंख्या असणाऱया आखाडेवाडीतील ग्रामस्थांना आतापर्यंत टाकीतून पाइप लाइनद्वारे पाणीपुरवठा होत होता. या टाकीत येणाऱया झऱयाचे पाणी कमी होऊ लागल्याने मागील आठवडय़ात पाणीपुरवठा बंद झाला. सद्यस्थितीत झऱयाचे पाणी कमी झाले आहे. डोंगरातील तीन-चार झऱयांवर दोनशे ते अडीचशे फूट खोल कडय़ालगत पाणी भरण्यासाठी महिला, लहानगे, पुरुषमंडळी रात्रंदिवस कसरत करत आहेत. डोंगरदरी, झाडाझुडपांच्या मार्गाने लहानगे, महिला पाण्यासाठी धडपडत आहेत. पावसाळा सुरू व्हायला बराचसा कालावधी असून, वेळेत पाऊस न पडल्यास पठारावरील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

अवकाळी पावसाने झऱयाचे पाणी वाढत नाही. पावसाळ्यातील पावसाने पठारावर पाणी साचून राहिले, तरच झऱयांच्या पाण्यात वाढ होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दिवसभर लहानगे झऱयावर तळ ठोकून आहेत. हा झरा लोकवस्तीपासून काही अंतरावर असल्यामुळे आपल्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातून कडक उन्हात डोक्यावरून पाणी भरावे लागत आहे. डोंगर उतारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्याने माथ्यावर आखाडेवाडी असल्याने त्याचा फायदा होणार नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.