मुंबई : आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर वनजमिनीच्या मुद्यावर राज्यभरातून आलेल्या आदिवासींनी आज सकाळी ठिय्या आंदोलन केले.
लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. वनजमिन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि आदिवासी कसत असलेली जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी संघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या, वनजमिनीच्या हक्कासाठी हे आंदोलन सुरू आहे. आदिवासी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्यात या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसून अद्यापही वन जमिनीवरील आदिवासींचे दावे मान्य करण्यात आले नाहीत. आदिवासी कसत असलेल्या जमिनीवरील पिके वनविभागाकडून नष्ट करण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात आदिवासी मंत्री के.सी. पाडवी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही प्रश्न प्रलंबित असून वनविभागाकडून आदिवासींना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी सहभागी झाले आहेत. अचानक पणे आंदोलन केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.