पुणे : राज्यभर गाजत असलेल्या टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती २४० कोटी रुपयांची असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. प्रत्येक परीक्षार्थीकडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचे तपासात समोर आले आहे.
या घोटाळ्याप्रकरणी परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. शिक्षक परीक्षा घोटाळ्यात सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्याचा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. टीईटी परीक्षेत आर्थिक गैरव्यवहार करताना प्रत्येक परीक्षार्थ्याकडून तीन ते चार लाख रुपये घेतले. त्यातून २४० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ७,५८० अपात्र परीक्षार्थीना पात्र करण्यात आले. एकूण ३ लाख ४३ हजार २८४ जणांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या अंतिम निकाल यादीत १६,७०५ जण पात्र ठरले. त्यांना शिक्षक पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. २०१९ मध्ये राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपरफुटीत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून राज्य परीक्षा परिषदेचे संचालकही सहभागी असल्याचे उघड झाले आहे.