शाहू कारखान्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले–ना. चंद्रकांतदादा पाटील ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कागल  :स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

 

 

लोकप्रिय निर्णयांपेक्षा लोकहिताचे निर्णय घेण्याची परंपरा शाहू कारखान्याने जपली असून त्यामुळेच सहकारी साखर कारखानदारीत आदर्श ठरलेल्या या कारखान्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.

येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ना.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे होते.

यावेळी शाहू साखर कारखान्यामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘श्री छत्रपती शाहू ठिबक सिंचन योजने’ अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमंजुरी पत्रांचे वाटप तसेच मागासवर्गीय समाजातील शेतकऱ्यांना जैविक निविष्ठांचे वितरण ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मुलींच्या उच्च शिक्षणासाठीच्या फी माफीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या मुलींच्यावतीने त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

ना. पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.रासायनिक खतांच्या अतिवापराला पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतीसह दैनंदिन जीवनात पाण्याची बचत आवश्यक आहे. ठिबक सिंचनाचे महत्त्व ओळखून शाहू साखर कारखान्याने त्याला दिलेले प्रोत्साहन अभिनंदनीय आहे. मुलींच्या फी माफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील त्यांचे प्रमाण वाढत असून त्यांना आणखीन सवलती देण्याचाही शासन विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,“ना.चंद्रकांतदादा पाटील हे गाजावाजा न करता काम करणारे नेतृत्व आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनासह त्यांच्या नेतृत्वातून आम्हाला प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचे स्वर्गीय राजेसाहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी ऊर्जा मिळते.आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबामध्ये शाहू कारखाना नेहमीच अग्रेसर राहिला आहे. केंद्र सरकारच्या सीएनजी व इथेनॉल धोरणानुसार शाहू साखर कारखान्याचा सीएनजी व इथेनॉल पंप सुरू करण्याचा मानस आहे.विविध कारणांनी अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही त्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली.

कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. संचालक डॉ. डी. एस. पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमास वीरेंद्रसिंहराजे घाटगे, अखिलेशराजे घाटगे, कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक-संचालिका, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,कागल नगरपालिकेचे नगरसेवक-नगरसेविका, शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ऋणानुबंधांना उजाळा 

 

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते.माझ्या तेरा वर्षांच्या फिरतीच्या काळात त्यांनी विविध माध्यमांतून आम्हाला मोलाची मदत केली. ते ज्या दिशेने जात असत, त्या दिशेने लोकांचा ओघ असायचा.असे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते दुर्मिळ असतात.त्यांचाच वारसा राजे समरजितसिंह घाटगे समर्थपणे पुढे नेत आहेत.असेही त्यांनी नमूद केले.

 

 

🤙 8080365706