राजाराम कारखान्यावरील कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणासाठी राजाराम श्री छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याला जबाबदार धरणे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असून ”आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी” असल्याचे कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, राजाराम सहकारी साखर कारखान्यास शुक्रवारी सायंकाळी ४८ तासांमध्ये उत्पादन थांबवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. कारखान्याचा गळीत हंगाम संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याने कालच संपला आहे. पाटील यांनी सांगितले की, मागील आठ-दहा दिवस पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मृत माश्यांचा खच नदीपात्रात दिसून आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन जनतेचा दबाव वाढू लागला. जनतेचा वाढता प्रक्षोभ लक्षात घेता प्रदूषण नियंत्रण मंडळाला काहीतरी कारवाई करणे भाग होते. पण ज्या कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतून सर्वात जास्त प्रदूषित पाणी व कचरा पंचगंगेमध्ये मिसळतो, त्या महापालिकेवर कारवाई करण्याचे धाडस आणि इच्छाशक्ती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. महापालिकेचे खापर राजाराम कारखान्यावर फोडण्याचा प्रयत्न प्रदुषण मंडळाला करावा लागलेला आहे. श्री राजाराम साखर कारखान्याचे कोणतेही प्रक्रिया युक्त पाणी पंचगंगेमध्ये सोडले जात नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.