हरभऱ्याला हमीभाव केंद्राशिवाय पर्याय नाही

नांदेड : यंदा हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र यातच पोषक वातावरणामुळे वाढत असलेली उत्पादकता यामुळे यंदा विक्रमी उत्पादन मिळेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ही उत्पादनाची चांगली बाजू असली तरी दुसरीकडे बाजारपेठेत हरभऱ्याच्या दरात अद्यापतरी सुधारणा झालेली नाही.

सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 700 पर्यंतच दर मिळालेला आहे. तर नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर निश्चित झालेला आहे. 1 मार्चपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरवात झाली असून नोंदणी प्रक्रियाही सुरु आहे. जिल्ह्यातील अर्धापुर खरेदी केंद्रात आतापर्यंत 800 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय नोंदणी करण्याचा ओघ हा सुरुच आहे.

यामुळे हमीभाव केंद्राशिवाय पर्याय नाहीकिमान शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र ही सुरु केली जातात. यापूर्वी खरीप हंगामातील तूरीसाठी हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली होती पण बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दर हे समानच असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत खुल्या बाजारात विक्रीला प्राधान्य दिले होते. पण हरभऱ्याच्या बाबतीत परस्थिती बदललेली आहे. हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावरच विक्री करावी लागणार आहे. शिवाय भविष्यात उत्पादनात वाढ झाली तर खुल्या बाजारपेठेतील दर अणखी कमी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे