कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवड

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी एक अभिमानानाची गोष्ट आहे. मराठमोळा कोल्हापूरकर युवा खेळाडू अनिकेत जाधव याची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या सामन्यांच्या तयारीसाठी भारतीय फुटबॉल संघ बहरिन व बेलारूस येथे दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. त्यासाठी भारतीय फुटबॉल महासंघाने शुक्रवारी संभाव्य ३८ जणांच्या भारतीय संघाची निवड केली. त्यात अनिकेत जाधव याचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय वरिष्ठ संघात निवड होणारा कोल्हापूरचा तो पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

सध्या तो हैदराबाद एफसी संघाकडून खेळत आहे. त्याने इंडियन ॲरोज, जमशेदपुर एफसी, पुणे एफसी संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे.
अनिकेतची २०१७ साली झालेल्या १७ वर्षाखालील युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली होती. तर संयुक्त अरब अमिरात येथे २५ ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान झालेल्या एएफसी अंडर २३ आशियाई चषक स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती.