इचलकरंजीचा विवान सोनी अकरा वर्षाखालील राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

हातकणंगले  (विनोद शिंगे)

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल ने आयोजित केलेल्या अकरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत इचलकरंजीच्या विवान प्रमोद सोनी ने आठ पैकी सात गुण करून तृतीय स्थान पटकाविले.यामुळे जळगाव येथे ऑगस्ट मध्ये होणाऱ्या अकरा वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी विवान ची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. श्री गणेश सभागृह व अश्वमेघ हॉल, कर्वे रोड, पुणे येथे झालेल्या या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ ३०२ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. यापैकी मुलांच्या गटात 220 मुलांनी तर मुलींच्या गटात 82 मुलीनी भाग घेतला होता.

स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या विवान सोनीला पाचवे मानांकन मिळाले होते. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत विवानने पहिल्या पाच फेऱ्यात अविराज चिरागिया (पुणे), प्रेयास वाघमारे (पुणे), श्लोक पवार (मुंबई), विहान राव (मुंबई) व ईशान अर्जुन पुणे) या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत पाच गुणांसह संयुक्त आघाडी घेण्यात यश मिळवले. नंतर सहाव्या फेरीत मुंबईच्या निर्वाण शहा शी बरोबरी साधली व महत्त्वाच्या सातव्या फेरीत द्वितीय मानांकित मुंबईच्या अर्जुन सिंग ला पराभूत करून आघाडी शाबूत राखली. अंतिम आठव्या फेरीत मुंबईच्या रेयांश व्यंकट बरोबर कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवून विवान ने आपले तृतीय स्थान निश्चित केले व अकरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. मुंबईच्या निर्वाण शहा ने साडेसात गुणासह अजिंक्यपद पटकाविले तर मुंबईच्याच विहान अग्रवाल ला उपविजेतेपद मिळाले. पोदार इंटरनॅशनल स्कूल,यड्राव मध्ये विवान सोनी इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. सध्या विवान ला अनिश गांधी व समुख गायकवाड यांचे बुद्धिबळ प्रशिक्षण लाभत आहे. त्याचबरोबर पोदार इंटरनॅशनल स्कूल,यड्राव चे प्राचार्य ईश्वर पाटील, विवान चे वडील प्रमोद सोनी व आई पुनम सोनी, चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले व मनिष मारुलकर या सर्वांचे प्रोत्साहन लाभले.

🤙 9921334545