मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून विधानसभेत दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व मंत्री छगन भुजबळ आमनेसामने आल्याने त्यांच्यात तू तू – मै मै झाले. त्यामुळे सभाग्रहात मोठा गोंधळ झाला.
विधानसभा सभागृह सुरू होताच विरोधकांनी ओबीसी आरक्षणावरून गदारोळ सुरू केला. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरत जाब विचारला. यापुढे ओबीसी आरक्षणाशिवाय एकही निवडणूक होता कामा नये. दरवेळेस तुम्ही आम्हाला सांगता, पण ओबीसींच्या आरक्षणावर ठोस कार्यवाही होत नाही. आमच्या समाधानासाठी मंत्रिमंडळाचे ठराव करू नका. ठरावाची अंमलबजावणी करण्याची हिंमत दाखवा.
त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देत ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्यासाठी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. त्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याने कामकाज २० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात चिखलफेक करून काही मिळणार नाही, यासाठी राजकारण न करता एकमेकांना साथ देत तोडगा काढू, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे