वाई : सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढल्याने व साखर कारखान्यांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के ऊस तोडणीअभावी शेतात उभा आहे.गावागावांत उसाचे फड तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या वर्षीचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला, परंतु ऊस उभाच असल्याने आणि उसाला तुरे आल्याने शेतकरी अडचणीत आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये सुरू झाले. या वर्षी जिल्ह्यात दीड ते पावणेदोन कोटी टनांची नोंद त्या त्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे झाली आहे. साताऱ्यात सात सहकारी व सात खासगी असे १४ साखर कारखाने आहेत .यातील किसन वीर सातारा, खंडाळा तालुका शेतकरी, प्रतापगड सहकारी हे तीन कारखाने बंद आहेत. यामुळे उत्तर सातारा जिल्ह्यातील व माण तालुक्यातील शेतकरी ऊस गाळपाला न गेल्यामुळे व उसाला तुरे आल्याने वजनात घट होत असल्याचे दिसत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मागील तीन-चार वर्षांत पाऊस चांगला असल्यामुळे जिल्ह्यात विक्रमी ऊस लागवड झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच सहकारी व खासगी कारखाने मागील वर्षांपर्यंत सुरू होते.
परंतु या वर्षी काही अडचणीमुळे तीन कारखाने बंद आहेत. त्यामुळे या वर्षी ऊस गळितास जाणार की नाही या चिंतेने या कारखान्यांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठय़ा कष्टाने दिवस-रात्र कष्ट करून तोडणीस आलेला ऊस पाठवायचा कोठे, हा मोठा प्रश्न जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतामध्ये मागील सतरा-अठरा महिन्यांपासून ऊस उभा आहे. त्यातच आजच तोड येईल, उद्या तोड येईल या आशेवर शेतकऱ्यांनी मागील महिना-दीड महिना उसाला पाणीही दिले नाही. त्यामुळे ऊस वाळून चालला आहे. उसाला तुरे आल्याने वजन कमी होऊन ऊस पोकळ होत आहे.