जयप्रभा स्टुडिओसाठी कोल्हापुरात फेस मास्क नगरफेरी

कोल्हापूर : कोल्हापूरची सिनेसृष्टी व भालजी पेंढारकर यांचा वारसा असलेला जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी आज, गुरुवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व कलाकारांनी फेस मास्क नगर फेरी काढली.

या फेरीत चेहऱ्यावर जयप्रभा स्टुडिओ बचावचा मास्क घालून शेकडो कलाकार सहभागी झाले.महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, चित्रपट महामंडळ कार्यालय, मिरजकर तिकटी मार्गे जयप्रभा स्टुडिओ येथे येवून फेरीचा समारोप झाला. यावेळी कलाकारांनी व आंदोलकांनी कोणत्याही घोषणा न देता फेस मास्क व मुकफेरीद्वारे या आंदोलनाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले.

जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे लोकमतमधून उघडकीस आल्यापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने साखळी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. गेल्या २० दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दारात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनाने व राज्यसरकारने दखल घेतलेली नसल्याने आता चित्रपट महामंडळाने आंदोलनाची व्याप्ती वाढवत लोकचळवळ उभी केली आहे.