कंत्राटी डॉक्टरांच्या पगारवाढीचा आरोग्य समितीच्या बैठकीत ठराव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या आज (गुरुवारी) झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत आरोग्य विभागाकडे बी.ए.एम.एस. म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांच्या पगारात वाढ करण्याचा ठराव करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे चार वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीने १५ डॉक्टर घेण्याचा निर्णय झाला होता त्यावेळी १२ डॉक्टर उपलब्ध झाले. सध्या ९ डॉक्टर कार्यरत असून त्यांना २५ हजार वेतन देण्यात येत होते त्यात १५ हजार रुपयांची वाढ करून त्यांना ४० हजार वेतन देण्याचा ठराव करण्यात आला.
त्याचबरोबर रखडलेले शाहू पुरस्कार देण्याबाबत निर्णय झाला. यामध्ये आशा सेविका, अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यासंदर्भात निर्णय झाला. आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य केलेल्या फलोरेनसन नाइटिंगल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जाणार आहे. येत्या ७ मार्च पर्यंत पुरस्कारांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर १५ मार्चच्या दरम्यान पुरस्कारांचे वितरण करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली .
स्वच्छ सर्वांग सुंदर दवाखाना या नाविन्यपूर्ण योजनेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. यात शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव व शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर आरोग्य केंद्रांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे. तर द्वितीय क्रमांक भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव केंद्रास जाहीर झाला. प्रथम क्रमांकास एक लाख रुपये तर द्वितीय क्रमांकास ७५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
इतर निवड झालेल्या आरोग्य केंद्रांमध्ये गाव व तालुका पुढील प्रमाणे मलिग्रे (आजरा), कोवाड (चंदगड), हलकर्णी (गडहिंग्लज), निवडे (गगनबावडा), पट्टणकोडोली (हातकणंगले), चिखली (कागल), शिरोली (करवीर), ठिपकुर्ली ( राधानगरी), बोरपाडळे ( पन्हाळा) या आरोग्य केंद्रांना ५० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
बैठकीस सभापती वंदना जाधव, सदस्य सुनिता रेडेकर, हंबीरराव पाटील, पुष्पा आळतेकर, संगीता पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.