पॅसेंजर मधून प्रवास करणाऱ्यांना आता मिळणार मासिक पास

कोल्हापूर: पॅसेंजर रेल्वेमधून नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांना आता मासिक पास देण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

मासिक पासमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेकडून रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती; परंतु आता ती पूर्वपदावर आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने काही रेल्वेगाडय़ा थेट बंद करण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या सकाळी सातारा-कोल्हापूर-सातारा, सायंकाळी कोल्हापूर-सातारा-कोल्हापूर पॅसेंजर आणि मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजर या तीन गाडय़ा धावत आहेत. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिह्यांतून प्रवाशांचा पॅसेंजर गाडय़ांना चांगला प्रतिसाद असतो. पॅसेंजर गाडय़ा सुरू झाल्याने कोल्हापूर येथे नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱया सातारा, सांगली जिह्यांतील प्रवाशांची संख्या मोठी आहे.

त्यांना प्रवासासाठी दररोज जनरल तिकीट काढावे लागत होते; परंतु रेल्वे मंत्रालयाकडून नियमित प्रवास करणाऱयांसाठी मासिक पास देण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.