कितीही गोंधळ घातला तरी मलिक यांचा राजीनामा नाही-जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले.

पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, भाजपची मंडळी नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे – नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र, विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले.

शाहरुख खानच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली, असेही जयंत पाटील म्हणाले.या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.