गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ

सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आज म्हणजेच १ मार्च २०२२ पासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे.

दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून १०५ रुपयांनी वाढून २,०१२ रुपये इतकी झाली आहे.तेल कंपन्यांनी सांगितले की दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर १०५ रुपयांनी वाढवण्यात आला आहे. नवीन किंमती आजपासून लागू होतील. या दरवाढीनंतर मुंबईमध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर १९६२ इतका झाला आहे, तर चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत २१८५.५० इतकी झाली आहे.

कोलकातामध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २०८९ रुपये मोजावे लागणार आहेत. या दरवाढीनंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवरील भार वाढेल आणि याचा फटका ग्राहकांनाही बसू शकतो. या कंपन्यांनी १ फेब्रुवारीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी केली होती.

सरकारी तेल कंपन्यांनी ५ किलोच्या लहान एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे. दिल्लीत आता ५ किलोचा एलपीजी सिलिंडर २७ रुपयांनी महागला आहे. ग्राहकांना हा सिलेंडर आता ५६९ रुपयांना मिळणार आहे. तथापि, या कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या किमती डिसेंबर २०२१ नुसार स्थिर असून मुंबई आणि दिल्लीमध्ये १४.२ किलो सिलेंडरची किंमत ९०० रुपये इतकी आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये हा दर ९१६ रुपये आहे.