कसबा सांगाव : देणार नाही, देणार नाही इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच, या घोषणेने सुळकुड (ता.कागल) येथील दूधगंगा नदीवरील पूल दणाणून गेला.
दत्तवाड घोसरवाड सुळकुड, कसबा सांगाव, मौजेसांगाव टाकळीवाडी दानवाड आदीसह दूधगंगा काठावरील नागरिक व शेतकऱ्यांनी घोषणा देऊन आंदोलन केले.इचलकरंजीला देण्यात येणाऱ्या पाणी योजनेला दूधगंगा बचाव कृती समितीने आज एक दिवस आंदोलन करून कडाडून विरोध दर्शविला. योजना रद्द केली नाही, तर यापुढेही उग्र आंदोलनासह न्यायालयीन लढाई लढली जाईल. ही योजना शासनाने ताबडतोब रद्द करावी किंवा दूधगंगा कृष्णा नदी संगमावरील दानवाड येथून पाणी द्यावे किंवा सध्या सुरू असलेल्या बस्तवाड येथील कृष्णा नदीच्या योजनेतूनच वाढीव पाणीपुरवठा करावा. मात्र, दूधगंगेचे पाणी कदापि दिले जाणार नाही, असे दूधगंगा बचाव समितीमार्फत प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले.
कसबा सांगावचे सरपंच रणजीत कांबळे, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील, दत्तवाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे, गुरुदत्त साखरचे संचालक बबनराव चौगुले, सुळकुडचे माजी सरपंच अण्णासाहेब चौगुले, पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार, ॲड.बाबासाहेब मगदूम आदींसह अनेक वक्त्यांनी यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी दूधगंगा बचाव कृती समिती दत्तवाडचे उपाध्यक्ष आण्णासो सिदनाळे, काले पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार, गुरुदत्तचे संचालक, बबनराव चौगुले, सुळकुड सरपंच सुप्रिया भोसले, सदस्य अमोल शिवई, कसबा सांगावचे आप्पासो पाटील, राजगोंडा पाटील, संजय पाटील, प्रमोद पाटील, तंटामुक्त अध्यक्ष बाळासो कोकणे, यांच्यासह विविध गावांतील सेवा संस्था, पाणीपुरवठा, दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.