कागल : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना देशद्रोही नवाब मलिक यांच्यासाठी एकत्र येण्यास वेळ आहे. पण, मराठी समाजाच्या मागण्यासाठी वेळ नाही, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे, असे परखड मत राजर्षि शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज व कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणस्थळी घाटगे यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली व उपोषणाला पाठिंबा दर्शवला.यावेळी घाटगे म्हणाले, छत्रपती घराणे व राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे जनक घराणे असलेले घाटगे कुटुंबीय ही दोन्ही घराणी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी एकत्रितपणे प्रयत्न करतील.
खासदार संभाजीराजे यांनी सातत्याने राज्य शासनाचे मराठा आरक्षण प्रश्नाविषयी लक्ष वेधून घेतले आहे. त्यांना शासनाकडून दिले गेलेले शब्द पाळलेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक होत असल्याने त्यांनी हा निर्णय समाजासाठी घेतला आहे. मराठा समाजाचा घटक व सेवक म्हणून मीही त्यांच्यासोबत राहण्याचा पहिल्यापासूनच निर्णय घेतला आहे.
शासनाने खा. संभाजीराजे या उपोषणाकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही. देशद्रोही दाऊदच्या नातेवाईकांशी खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या महाविकास आघाडीतील नवाब मलिक या मंत्राच्या पाठिंब्यासाठी मंत्री रस्त्यावर उतरत आहेत. मात्र त्यांना मराठी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकत्र यावे असे वाटले नाही.