राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे; छत्रपती उदयनराजे यांचा इशारा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असून त्याबाबत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असा इशारा ट्विटव्दारे दिला आहे.

औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असं वक्तव्य केलं. तसेच चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच समाजात गुरूचे मोठे स्थान असते. तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल कोश्यारी त्या कार्यक्रमात म्हणाले होते.यावर खासदार छत्रपती उदयनराजे यांनी ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असा इशारा दिला आहे.