27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम

कोल्हापूर : पोलिओ निर्मूलनासाठी शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना रविवारी (दि.27) पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. यावर्षी जिल्ह्यातील 2 हजार 423 केंद्रांवर 3 लाख 8 हजार 360 बालकांना डोस देण्यात येणार आहेत.

याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात केंद्रे स्थापन करण्यात आली असून, त्याकरिता 6999 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यासाठी 3 लाख 90 हजार पोलिओ डोस प्राप्त झाले आहेत. नुकतेच जन्मलेल्या बाळालादेखील पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार, धार्मिकस्थळे, बसस्थानके, टोल नाके व रेल्वेस्टेशनवर तसेच दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांवरील भटक्या जमाती, ऊसतोडणी मजूर यांच्या मुलांना पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.