मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर करत कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत असतानाच आणखी एका शिवसेना नेत्याची चौकशी सुरु झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने नवाब मलिक यांना अटक केली असल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले आहेत. यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु आहे.
प्राप्तिकर विभागाचं पथक मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील घऱी पोहोचलं आहे. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे. दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत.मिळालेल्या माहितीप्रमाणे, नवाब मलिक यांच्याप्रमाणे पहाटेच प्राप्तिकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं. मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा सहभाग असतो.
पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितिची महत्वाची भूमिका असते. याआधी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव शिवसेनेचे महत्वाचे नेते असल्याने या कारवाईमुळे राजकीय वातावरण अजून पेटलं जाण्याची शक्यता आहे.