जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली

कोल्हापूर : आज मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत महिला बालकल्याण विभागातील अंगणवाडी इमारत निधी, डी. आर. डी. विभागा अंतर्गत महिला बचत गटांची लाखोंची फसवणूक , ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाई आदी विषयांवर सभागृहात सदस्यांनी आवाज उठवला. अनेक विषयांवर अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.

एका विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी व सदस्यांमध्ये वादावादी झाली. आज झालेली सर्वसाधारण सभा ही शेवटची असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र दुपारी 1 वाजता सभा सुरू होण्याची वेळ असताना प्रत्यक्षात सभेला 2 वाजता सुरुवात झाली. त्यामुळे सभेमध्ये विषयांवर होणारी चर्चा म्हणावी तितकी रंगतदार झाली नाही. या पूर्वी झालेल्या सभे प्रमाणेच आजची सभा झाली.

आज झालेल्या सभेत सदस्यांकडून अभिनंदन ठराव मांडले जात होते, मात्र माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासने यांनी विद्यमान शिक्षण सभापती यांनी आपल्याला निधी दिला नाही म्हणून त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. सासणे यांनी असाही ठराव मांडल्याने अनेक सदस्यांच्या भुवया उंचावल्या. सदस्य विजय भोजे यांनी टोकरे, कोळी -महादेव या जातीवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत विविध जाती लिहिलेला प्लास्टिकचा कोट परिधान केल्याने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. गेल्या 50 वर्षात हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. आमची नेमकी जात कोणती सांगा असा प्रश्न उपस्थित करत सभागृह हलवून ठेवले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी एक विशेष बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ असे सांगितल्यानंतर हा विषय थांबला. त्यानंतर सभागृहात डी आर डी मधील अंतर्गत बचत गटात काम करणाऱ्या महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याबाबत ,संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी सदस्य विजय भोजे यांनी करताच, समाजातील महिला सदस्य ही आक्रमक झाल्या ,आणि सभागृहात या विषयावर गदारोळ झाला. जवळपास 20 मिनिटंहून अधिक काळ या विषयावर वाद सुरू होता. सभागृहातील सर्व सदस्य उठून उभी राहिल्याने अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी ही उठून उभे राहिले. मात्र पदाधिकारी उभे राहिल्याने सदस्यांमध्ये याबाबत कुजबूज सुरू होती. दरम्यान एका विषयावर स्वाती सासणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रश्न विचारला असता ते थोडेसे भडकले यावर माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपण लोकप्रतिनिधींना अस मोठ्या आवाजात कसे बोलता असा प्रश्न केला? लोकप्रतिनिधींना आपण असं बोलणं योग्य नाही, असं सांगत त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली, यादव आणि चव्हाण यांच्यात थोडी वादावादी झाली. यावेळी सभागृह शांतता पसरली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असे सांगितले की डी. आर. डी कडे कर्मचारी आहेत ते रोजंदारीवर आहेत, त्यांच्यावर कारवाई करून त्यांना काढून टाकू असे सांगितल्यानंतर या विषयावर पडदा पडला.

त्यानंतर सभागृहात अंगणवाडी निधी बाबत सदस्य प्रसाद खोबरे यांनी प्रश्न उपस्थित करत अंगणवाडी निधीतून भाजपा सदस्यांना का डावल असा सवाल केला. चार भाजप सदस्यांना निधी देण्यात आला ते काय अधिकाऱ्यांचे पै पाहुणे आहेत का असे खोबरे म्हणाले यावर महिला बालकल्याण सभापती शिवानी भोसले यांनी उर्वरित सदस्यांनाही निधी दिला जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील पाणी योजनांवर सभागृहात जोरदार चर्चा झाली.

31 मार्च अखेर सर्व योजनाना मंजुरी मिळणार का असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर सुगम आणि दुर्गम शाळा तसेच शिक्षकांच्या बाबतीत सभागृहात चर्चा झाली. आज झालेल्या सभेत सदस्य मनोज फराकटे, युवराज पाटील, भगवान पाटील, पांडुरंग भांदीगरे, अरुण इंगवले, शिवाजी मोरे, आकांक्षा पाटील, आदी सदस्यांनी विविध विषयांवर सभाग्रहात प्रश्न विचारले. या सभेस अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंत शिंपी, महिला बालकल्याण सभापती शिवानी भोसले, शिक्षण सभापती रसिका पाटील, बांधकाम सभापती वंदना जाधव, समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.