कोल्हापुरात आज शिवाजी तरुण मंडळाची भव्य मिरवणूक

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी भगवे झेंडे, गडकोटांच्या प्रतिकृती, विद्युत रोशनाईने कोल्हापूर सजले आहे.

कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी होण्याबरोबरच निर्बंध शिथिल झाल्याने तरुण मंडळे, तालमी संस्था, संघटनांतर्फे आयोजित जन्मकाळ सोहळा, व्याख्याने, पोवाडे आदी विविध कार्यक्रम, उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने आज, दुपारी साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोल्हापूर शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह घोडे, उंट हेही आकर्षण असून जिल्हा प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून मिरवणूक काढणार असल्याची माहिती मंडळाचे सहसचिव सुरेश जरग यांनी दिली.

दुपारी साडेचार वाजता शिवाजीपेठेतून शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, खासदार संभाजीराजे, खासदार संजय मंडलीक आदींच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे परवानगी मागितली आहे. ते परवानगी देतील असे वाटते, तरीही कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून मिरवणूक काढणार असल्याचे जरग यांनी सांगितले.

असा राहणार मिरवणुकीचा मार्ग

शिवाजी पेठ- अर्धा शिवाजी पुतळा- बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी चाैक, गुजरी कॉर्नर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, साकाली कॉर्नर ते शिवाजी पेठ.