वारणानगर : वारणा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ११ लाख ४२ हजारावर टनाचे उच्चांकी गाळपाबरोबरच सरासरी साखर उता-यात उच्चांक राखत सहविजनिर्मिती प्रकल्पातून ७ कोटी युनिट्सच्या निर्यातीचा टप्पा पुर्ण केला असून डिस्टीलरीतूनही १ कोटी ४० लाखांपर्यंत चा देशपातळीवरील इथेनॉल निर्मितीचा उच्चांक सिद्ध केल्याने वारणेने साखरेतून सोनं निर्माण करण्याचा अलौकिक आदर्श जोपासला असल्याची माहिती वारणा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चेअरमन डॉ विनय कोरे वारणा साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना पुढे म्हणाले की १२० दिवसाच्या चालू गळीत हंगामात आलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर दर पंधरा दिवसाला ५ आणि २० तारखेला ऊसाची बिले वेळेवर दिली आहेत तसेच ३१ जानेवारी पर्यंत ची ऊसबिले देखील २१ तारखेला देण्यात येणार आहे. तोडणी वाहतूक दारांच्या टोळ्यांना देखील २० ते २५ कोटींचा अँडव्हान्स दिला असून १५ जानेवारी पर्यंत ची ऊसतोडणी वाहतुकीची बिले सुध्दा देण्यात येणार असल्याचे डॉ कोरे यांनी आवर्जून सांगितले. वारणेने रसापासून इथेनॉल निर्मिती वर भर दिला असून पहिल्याच वर्षी ६० हजार लिटरची कमी क्षमता असूनही आज १ लाख १ हजार लिटर इथेनॉलची निर्मिती करत देशात उच्चांक निर्माण केला आहे.तर १२० दिवसात रेक्टीफाईड स्पिरीटचे सुध्दा ९० लाखांवर उत्पादन घेतले आहे. सहविज निर्मिती प्रकल्प येत्या दहा दिवसात हस्तांतरित होणार असून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विजनिर्मिती करणारा वारणा कारखाना ठरला असून ७ कोटी युनिट्स निर्यातीचा टप्पा देखील नुकताच पुर्ण केला असल्याचे सांगत हंगाम समाप्तीपर्यंत पावणे दहा कोटी युनिट्स विजनिर्मितीचा टप्पा गाठायचा मनोदय असल्याचे डॉ कोरे यांनी आवर्जून सांगितले. कारखान्याच्या आँफसिजनमध्ये सुध्दा साडे पाच ते सहा कोटी युनिट्स तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कारखान्याला सर्व पातळीवर उच्चांक सिद्ध करण्यासाठी कारखान्याचे कामगार, ऊस उत्पादक, शेतकरी सभासद,वाहतूक कंत्राटदार,या सगळ्याच घटकांनी वारणेप्रती सहकार्याची सद्भावना जोपासल्यामुळेच यशस्वी वाटचाल करता आल्याचे डॉ विनय कोरे यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत,सचिव बी बी दोशींगे,तज्ञसंचालक एन एच पाटील ,आदीसह संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.