कोल्हापुरातील क्रीडा संकुलच्या जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लागणार

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावाच्या समस्येचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. तलावात फ्लोटिंग स्टील टॅंक (तरंगणारा) बसवण्यात येणार आहे.

यासाठी ६ कोटींचा खर्च होणार आहे.क्रीडा संकुलाच्या कामांना उशिरा का होईना; पण सुरुवात होत आहे. दोन तलाव, डायविंग प्लॅटफॉर्म, बैठक व्यवस्था अशी रचना असणाऱ्या या ठिकाणी परिसरातील पाण्याचे उमाळे फुटल्याने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या तलावात पक्षी जलविहार करत होते. सध्या या तलावात स्टीलचा फ्लोटिंग टॅंक बनवण्यात येणार आहे. उमाळ्यातून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

येथील मुख्य मैदानाचा वापर वाढला आहे. फुटबॉलसह मैदानी खेळांचा सराव होत आहे. मुख्य मैदानावर विद्युतीकरण, मोकळ्या जागेत मल्टिस्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स बनवण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची मागणी केली असून, ती मंजूर झाली आहे. एकूण १२ खांब असून एलईडी अधिक प्रकाश देणारे दिवे लावण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे कमी प्रकाशात अथवा अंधारातही सराव करणे शक्य होणार आहे. संकुलाच्या आवारातील मोकळ्या जागेत मल्टिस्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स बनवण्यात येणार आहे. ज्यात ६ बॅडमिंटन कोर्ट, विविध मार्शल आर्टस्, टेबल टेनिससह अन्य इनडोअर खेळांच्या सरावासह राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेणे शक्य होणार आहे. या संकुलात बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, शॉवर रूम, स्टोअर सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.