शिरोली : शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या हलगर्जीपणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेच्या प्रसुतीनंतर बाळ दगावले.
संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय बाळाला ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी आणि सरपंच शशिकांत खवरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने दिवसभर घेतला होता.दुपारी चार वाजता जिल्हा परिषदेचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर बालकाला नातेवाईकांनी ताब्यात घेतले.साक्षी सतीश बेडेकर (वय २६, रा. शिरोली माळवाडी, आंबेडकर चौक) या पोटात दुखायला लागल्यावर प्रसूतीसाठी सकाळी ८.४५ वाजता, शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात खासगी गाडीतून आल्या होत्या. पण सकाळी ९.३० पर्यंत या महिलेला उपचार मिळाले नाहीत. तब्बल ४५ मिनिटे ही महिला प्रसूतीच्या कळा सोसत आरोग्य केंद्राच्या दारातच थांबून होती. यावेळी नातेवाईकांनी महिलेला उपचार व्हावेत यासाठी धडपड केली.त्यानंतर ९.३० वाजता १०८ रुग्णवाहिका व डॉक्टर आल्यावर बाळाची नाळ कापली. त्यावेळी बाळ दगावले होते. यावेळी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आक्रोश करत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत उपचार केले नसल्याने बाळ दगावले आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणून शिरोली पोलीस ठाणे गाठले.शिरोली सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, जोतिराम पोर्लेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज यांना धारेवर धरत जाब विचारला. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात ठिय्या मांडला. यानंतर जिल्हा परिषदेचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी बाळाला ताब्यात घेतले.