सामान्य नागरिकाला या बजेटमधून नक्की काय मिळाले ? — ना.सतेज पाटील

कोल्हापूर : या वर्षीचे बजेट म्हणजे येऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेला ‘जुमलासंकल्प’ आहे. कधीच अंमलबजावणी न होणाऱ्या पोकळ घोषणा देण्याची गेल्या ७ वर्षांतील परंपरा यावर्षीही सुरू राहिली आहे. सामान्य नागरिकाला या बजेटमधून काय मिळाले असा प्रश्न करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या भारतातील मध्यमवर्गीय व पगारदार वर्गाचा भ्रमनिरास टॅक्स ब्राकेट न वाढवून या बजेट ने केलेला आहे. ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी भाजप सरकारच्या काळात निर्माण झाल्याचे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. यावर कोणताही ठोस उपाय न योजता ६० लाख रोजगार देण्याचे पोकळ आश्वासन फक्त देण्यात आलेले आहे.

आभासी चलनावर लादलेला कर हा गेल्या दोन वर्षातील या चलनात गुंतवणूक केलेल्या रिटेल गुंतवणूकदारांना मारक ठरणार आहे. एकीकडे कर लावला आहे मात्र आभासी चलनाच्या नियमांबाबत मात्र काहीच स्पष्टता नाहीये.सामान्य नागरिकाला या बजेटमधून नक्की काय मिळाले हे शोधूनही सापडत नाही आहे. देशातील सर्वसामान्य माणसांचा आवाज ऐकायचाच नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा घेतलेली दिसतीये. असही पालकमंत्री पाटील म्हणाले.