कोल्हापूर पर्यटन सुरू मग ताडोबा बाबतीत दूजाभाव का?

चंद्रपूर : जागतिक ख्यातीच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणारी सफारी कोविडच्या कारणावरून राज्य शासनाने डिसेंबर महिन्यापासून बंद केली आहे.दुसरीकडे शहरात दररोज अनियंत्रित गर्दी होत आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनही सुरू झाले.

मग ताडोबाच्या पर्यटनासह यावर अवलंबून असणाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून हा दुजाभाव का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर आहे. महाराष्ट्रालगतच्या मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये सफारी सुरू आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने २४ जानेवारीपासून जिल्ह्यातील पर्यटन पर्यटकांसाठी कोरोनाचे नियम पाळत सुरू केले आहे.

कोरोनाची जी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. जवळपास तीच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याचीही आहे. काेल्हापूरसाठी एक निर्णय आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी दुसरा निर्णय का, असा सवालही व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ताडोबातील पर्यटन सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. या प्रस्तावावर मात्र सोमवारी दुपारपर्यंत कोणताही निर्णय झाला नव्हता.