कोल्हापुरात चालत्या मोटारीवर झाड कोसळल्याने चालक जखमी

कोल्हापूर : जुने झाड कोसळून चालत्या मोटारीचा चक्काचूर झाला. जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोल पंप रस्त्यावरील महावीर गार्डन परिसरात गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली.

मोटारीत असलेले चालक चंद्रकांत देसाई (वय ६२, रा. उचगाव) जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. झाडासोबतच पथदिव्याच्या विद्युत वाहिन्याही तुटल्यामुळे तेथे धोकादायक स्थिती झाली होती.दरम्यान, अग्‍निशमन दलाच्या जवानांनी आणि वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दाखल होऊन वीजपुरवठा खंडित केला. रस्त्यावरील झाड बाजूला काढल्यामुळे बंद असलेला रस्ता एकेरी मार्गाने वाहतुकीस सुरू झाला. शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे साधारण दुपारी दोनच्या सुमारास झाडाच्या फांद्याबाजूला काढून परिस्थिती नियंत्रणात आली. सायंकाळपर्यंत दुतर्फा रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गावर महावीर गार्डनजवळ जुने मोठे झाड दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आचानक कोसळले. तेथून जाणाऱ्या एका मोटारीवर ते पडल्याने मोटारीतील चालक चंद्रकांत देसाई हे किरकोळ जखमी झाले.