कोल्हापूर : दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फेराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे, दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षाही अर्धवट अवस्थेत झाल्या. यंदा अभ्यासक्रम ६५ टक्के ऑनलाईन व १० टक्के ऑफलाईन पध्दतीने पूर्ण झाला. यातही जिल्ह्यातील नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती पाहता ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवून झाले आहे, असे रेकॉर्ड उपलब्ध असेल, असे वाटत नाही. ४ ऑक्टोंबर २०२१ पासून दहावी व बारावीचे ऑफलाईन शिक्षण सुरू झाले.१० टक्के ऑफलाईन अभ्यासक्रमाच्या आधारे ऑफलाईन परीक्षा घेणार का?जर ६५ टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन झाला असताना ऑफलाईन परीक्षेचा अट्टहास कशासाठी? ७५ पैकी ६५ टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन झाला असताना परीक्षा ऑनलाईन का होऊ शकत नाहीत? कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी शिक्षण विभाग घेणार आहे का? त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे. श्री. सोनवणे यांनी वरिष्ठ स्तरावर निवेदन पाठवले जाईल, असे सांगितले.