पोलिसांसाठी बूस्टर डोसच्या कॅम्पचे आयोजन

कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे धोके लक्षात घेता पोलिसांसाठी बूस्टर डोसच्या कॅम्पचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. आवश्यक ती काळजी घ्या, धोका वाढतोय, अशा सूचनाही प्रशासनाकडून पोलिसांना केल्या जात आहेत.

कोरोना काळात सुरवातीपासून पोलिस अग्रस्थानी राहून काम करत आहेत. पहिल्या दुसऱ्या लाटेत बंदोबस्ताबरोबर मदत कार्यात जिल्हा पोलिस दल सक्रीय होते. कंटनेन्मेट झोनवरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात असायचा. दररोज अनेकांशी येणाऱ्या संपर्कातून अनेक पोलिस कोरोनाबाधित झाले होते.

कोरोनाची तिसरी लाट डोकेवर काढते आहे. काही पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात अधिकारी वर्गांचाही समावेश आहे. यातील अनेकांना डिस्चार्जही मिळाला आहे. हा धोका विचारात घेऊन वरिष्ठांकडून पोलिसांना बुस्टर डोस घेता यावा, यासाठी कॅम्पचे आयोजनही केले आहे. अलंकार हॉल येथे काही दिवसापूर्वी बुस्टर लसीचा कॅम्प घेतला होता. यात २६३ पोलिस कर्मचारी हा डोस घेतला. अशा पद्धतीचे कँम्प ग्रामीण भागात आयोजित करून पोलिसांना बुस्टर डोस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बुस्टर लस वेळेत घ्या. मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. कर्तव्य बजावताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा अशा सूचनाही देण्यात येत आहेत.