इ -श्रमिक नोंदणीमध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर

कोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-श्रमिक पोर्टलवर जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजार ५७४ जणांची नोंदणी झाली आहे.स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांनी यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.

देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षीत करण्यासाठी केंद्र सरकारने ई श्रमीक पोर्टलची निर्मिती केली. सर्व श्रमिकांनी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन केले. मात्र असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अल्पशिक्षीत काम करतात. त्यांना ही नोंदणी करणे अवघड आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांची संख्या पाहता शासकीय यंत्रणा यासाठी तोकडी होती..नोंदणीतील या अडचणी लक्षात घेऊन विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला. त्यांनी विशेष शिबिराचे आयोजन केले.झोपडपट्ट्या, गावागावातील शेतमजुरांच्या वस्त्या, ऊसतोडणी कामगार यांच्यात प्रबोधन करून त्यांनी नोंदणी केली. याशिवाय असंघटीत क्षेत्रातील व्यावसायिकांशी संपर्क करून त्यांच्याकडूनही नोंदणी करून घेतली.यात शेतमजूर, बांधकाम कामगार, खासगी आस्थापनातील कामगार यांच्यासह अन्य कामगार, मजूर, कारागिरांचा समावेश आहे. या नोंदणीनंतर प्रत्येकाला श्रमिक कार्ड दिले जाणार आहे. नोंदणीत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. या अंतर्गत पेन्शन योजनाही राबवली असून वयोमानानुसार ५० ते २०० रुपयापर्यंतचा हप्ता आहे. यात शासनाकडून तेवढीच रक्कम देण्यात येते. त्यामुळे निवृत्तिवेतन मिळते.