कोल्हापूर : कोल्हापूर-मिरज मार्गाचे विद्युतीकरण झाले. पण, विद्युतीकरणाबरोबरच दुहेरीकरणाचीही मागणी होती. विद्युतीकरण पूर्ण झाले; पण दुहेरीकरणाचे काय?कोल्हापूर-मिरज दुहेरीकरण होणार का? असे अनेक प्रश्न आहेत.
पुणे विभागातील प्रमुख मार्गांचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. त्यात केवळ कोल्हापूर-मिरज हा मार्ग बाजूला पडला आहे.पुणे-मिरज या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याबरोबर मिरज-लोंढा या मार्गाचेही काम सुरू आहे. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्णही होतील. त्यामुळे गाड्याची संख्या, गती वाढणार. पण त्याचा फायदा कोल्हापूरला फारसा होणार नाही. कारण कोल्हापूर-मिरज हा सध्या एकेरी मार्ग असल्याने नव्या गाड्या सोडणे, गाड्यांची गती वाढवणे याला मर्यादा येणार आहे.कोल्हापुरातून नव्या गाड्यांबरोबर पुणे स्थानकातून सोडण्यात येणार्या काही गाड्यांचा कोल्हापूरपर्यंत विस्तारही करता येणे शक्य आहे. मात्र, कोल्हापूर-मिरज आणि मिरज-पुणे या मार्गावर सध्या एकेरीच वाहतूक सुरू असल्याने त्यालाही मर्यादा असल्याचे कारण रेल्वेकडून पुढे केले जाते. यापूर्वी एकेरी मार्गावरूनच गाड्या धावतात, त्यांची संख्या गेल्या काही वर्षांत तिपटीने वाढली आहे. आणखी दोन-तीन वर्षांनंतर मिरज-पुणे असा दुहेरी मार्ग उपलब्ध होणार आहे. मात्र, त्यावेळी कोल्हापूर-मिरज हा मार्ग एकेरी असल्याचे कारण पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.सध्या कोल्हापूर-मिरज या 48 कि.मी.च्या अंतरावर दररोज 26 गाड्यांची ये-जा सुरू असते. याखेरीज मालवाहतूक वेगळीच. यामुळे या मार्गाचे दुहेरीकरण करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. सध्या रेल्वेकडे दुहेरीकरणासाठी जमीन उपलब्ध आहे. काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणी जमिनीची समांतर पातळीही करून ठेवलेली आहे. यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीवरील दोन मोठे पूल आणि काही ठिकाणचे छोटे पूल वगळता अन्य ठिकाणच्या कामाला फारसा वेळ लागणार नाही.