विद्यापीठ, महाविद्यालये उद्यापासून गजबजणार

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या निर्देशांनुसार शिवाजी विद्यापीठ अधिविभाग व संलग्‍नित महाविद्यालये, शिक्षण संस्थांमधील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे नियमित वर्ग 1 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षरीत्या ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत.त्यामुळे पुन्हा महाविद्यालय कॅम्पस विद्यार्थ्यांनी गजबजून जाणार आहे.

विद्यापीठ अधिविभाग व संलग्‍नित महाविद्यालये, मान्यता प्राप्‍त शिक्षण संस्थांमधील नियमित वर्ग सुरू करणे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबत प्रभारी कुलसचिव डॉॅ. व्ही. एन. शिंदे यांनी 28 जानेवारी रोजी परिपत्रक काढले आहे.त्यानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 276 महाविद्यालये सुरू होणार आहेत. यात 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन्ही डोस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. नियमित वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्‍त, जिल्हाधिकारी यांची संमती घ्यावी.विद्यापीठ, महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा.

याची प्राचार्य, अधिविभाग प्रमुख व प्रशासकीय विभागप्रमुखांना माहिती द्यावी. कोरोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाविद्यालय, अधिविभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती 100 टक्के ठेवायची किंवा ती कमी करायची याचा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यावा.त्याचा अहवाल महाविद्यालयांनी विद्यापीठातील संलग्‍नता विभागास व विद्यापीठातील अधिविभाग व प्रशासकीय विभागांनी आस्थापना विभागास द्यावा, अशा सूचना कुलसचिवांनी दिल्या आहेत.