कोल्हापूर( प्रतिनिधी) गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेवून संघात चालू असलेला चुकीचा कारभार जनतेसमोर मांडला. महाडिक वहिणींच्या आरोपांना तथ्यांच्या आधारावर खोडून काढणे शक्य नसल्यानेच जनतेची दिशाभूल करण्यासाठी मागील दोन दिवस गोकुळच्या सत्ताधाऱ्यांकडून पत्रकबाजी सुरू आहे याबाबत आज (शुक्रवारी) प्रतापसिंह पाटील (कावणेकर) यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे आहे.
कावनेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे मुळात पशुखाद्य वाहतुकीला गाड्या घेऊन संघाचं आर्थिक नुकसान केलं असा आरोप कोणीही केलेला नाही. पण त्या गाड्या घेताना सहकाराचे नियम का पाळले गेले नाहीत? निविदा प्रक्रिया का राबवली गेली नाही ? एका ठराविक कंपनीलाच प्राथमिकता का दिली गेली ? त्याच कंपनीला काम देण्यात कोणाचा आर्थिक लाभ आहे ? हे खरे प्रश्न आहेत. ज्याची उत्तरं देणं सत्ताधारी जाणूनबुजून टाळत आहेत. आजपर्यंत महाडिक साहेबांच्या टँकरवर टीका करणाऱ्यांचा खरा चेहरा यानिमित्ताने उघडा पडला आहे. कारण महाडिक यांच्या वाहतूक कंपनीचे जितके टँकर संघाकडे दूध वाहतुकीला आहेत, ते रीतसर निविदा प्रक्रिया पूर्ण करूनच घेतलेले आहेत. जर तसं नसतं तर आता तुमच्या सत्तेच्या काळातही त्यांच्या कंपनीला काम मिळालंच नसतं, हे न कळण्याइतकी जिल्ह्यातील जनता दूधखुळी नाही. म्हणूनच ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ही म्हण या सत्ताधाऱ्यांसाठीच बनवली गेली आहे की काय, असा प्रश्न आज सर्व जनतेला पडला आहे.अस ही या पत्रकात म्हंटल आहे.
गडमुडशिंगी आणि कागल येथील संस्थांचे संकलन राजकीय खुन्नस ठेऊन बंद केलं गेलं. संचालकांची शिफारस आणणे हा पायंडा मागील 30 वर्षे असला तरी कधी कोण्या संचालकांने याचा गैरवापर केलेलं जिल्ह्याने याआधी पाहिलं नाही. मुळात संघात राजकारण आणू नये, हेच तत्व ठेऊन आमच्या नेत्यांनी 30 वर्ष कारभार केल्यामुळे आज संघ 5 रुपयावरून 50 रुपयांपर्यंत पोचला, हे विसरू नये. मात्र आता परिस्थिती तशी राहिली नाही, म्हणूनच तुम्हाला कायद्याचा आरसा दाखवायची वेळ आमच्यावर आलेली आहे.
संचालक अंजना रेडेकर यांनी पत्रक काढून महाडिक वहिणींना प्रत्युत्तर दिल्याची बातमी वाचली. जुन्या गोष्टी काढल्या तर दमछाक होईल वगैरे मुक्ताफळे त्यांनी उधळली असल्याचे समजते. तर त्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की, 30 वर्षाचा हिशोब आपल्याकडे असेल तर जरूर काढा. एवढंच कशाला ? त्या 30 वर्षातील प्रदीर्घ काळ चेअरमन असलेले 2 महारथी आज तुमच्याकडे आहेत. त्यांनासुद्धा आवर्जून हिशोब विचारा. आणि जर तुमच्यात तेवढं धाडस नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही व्यवस्थित सगळा हिशोब जनतेसमोर ठेवायला कधीही तयार आहोत.
मला एक गोष्ट समजत नाही, प्रत्येक पत्रकात सत्ताधारी मंडळी म्हणत आहेत की, शौमिका महाडिक यांनी अर्धवट माहितीच्या आधारे आरोप केले. मग सत्ताधाऱ्यांनी पत्रक काढण्यापेक्षा महाडिक यांनी मागितल्याप्रमाणे संपूर्ण माहिती कागदपत्रांसह त्यांना उपलब्ध करून का देत नाहीत ? एवढी धमक असेल आणि एवढेच हे धुतल्या तांदळाचे असतील तर पत्रकबाजी बंद करून सगळी कागदपत्र जनतेसमोर ठेवावीत! कशाची एवढी भीती आहे? शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की उगाच कोणीतरी लिहून देतं म्हणून पत्रक काढायची हा बालिशपणा इथेच थांबवावा आणि इथून पुढे स्वतःची उंची तपासून बोलावं. अन्यथा चेअरमन यांनी ध्यानात ठेवावं.. बात निकली है..तो दूर तलक जाएगी असेही शेवटी या पत्रकात प्रतापसिंह पाटील (कावनेकर) यांनी म्हटलआहे.