कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील एका शेतकऱ्याने ऊस पिकात आंतरपीक म्हणून चक्क गांजाची लागवड केली आहे. सदाशिव आप्पासाहेब कोळी, असे संशयित आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी या गांजाच्या शेतात व आरोपी कोळी याच्या घरावर छापा टाकून 490 गांजाची रोपे आणि सुका तयार पाच किलो गांजा, असा लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.या आंतरपिकाच्या शेतीमुळे गावात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी कोळी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाची शेती करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, सैनिक टाकळी येथील शेतकरी कोळी याने आपल्या उसात (गट नं. 1005) मध्ये चक्क गांजाची लागवड केली आहे.
गुरुवारी सायंकाळी गांजा शेतीवर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला असता यावेळी ऊस पिकामध्ये दोन ते तीन फूट उंचीची गांजाची रोपे आढळून आली. पोलीस पथकाने शेतात फिरून रोपे उपसली असता 490 रोपे मिळून आली.
त्यानंतर पोलिसांनी कोळी याच्या घरावर छापा टाकला असता पाच किलो तयार गांजा व गांजाच्या पुड्या मिळून आल्या. या प्रकाराने खळबळ उडाली असून, गांजा पिकाच्या उत्पादनाला बंदी असतानाही शेतकऱ्याने राजरोसपणे या पिकाचे उत्पादन घेत असल्याने पोलीसही चक्रावून गेले. तयार झालेला गांजा शेतकरी कर्नाटकात विक्री करत असल्याचे समजते. त्यामुळे गांजाचे रॅकेटही उघडकीस येण्याची शक्यता आहे.