कोल्हापूर : महापालिका परिवहन (के.एम.टी.) विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज साखळी उपोषणाला प्रारंभ केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रा. शहाजी कांबळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या.
आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले. निवेदनातील माहितीनुसार, के.एम.टी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करा, रोस्टर तपासणी करा, पदोन्नती द्या, २५ टक्के पगार कपातीमधील रक्कम परत द्या या मागणीसाठी वारंवार प्रशासनाकडे अर्ज विनंती केली. मात्र, प्रत्येकवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. एकही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अखेर के. एम. टी कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आजपासून हे उपोषण सुरू झाले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. युनियनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, अनिल कदम हे आज उपोषणाला बसले.