पिंपरी : जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख करून इंजिनिअर तरुणीस लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर इंजिनिअर तरुणानेतिच्याशी मैत्री करून बर्थडे पार्टीला बोलावून बलात्कार केला.
निशांत हरीश चंदनानी (वय ३४, रा. रतलाम, मध्य प्रदेश) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी इंजिनिअर असून ती घटस्फोटित आहे. त्याच प्रमाणे आरोपी देखील इंजिनिअर असून घटस्फोटित आहे. दुसरे लग्न करण्यासाठी पीडित तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्या वेबसाईटवरून आरोपीने पीडित तरुणी सोबत ओळख केली. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून आरोपीने पीडित फिर्यादी तरुणीशी मैत्री केली.
त्यानंतर आरोपीने त्याच्या वाढदिवसानिमित्त भुमकर चौक, हिंजवडी येथील त्याच्या राहत्या घरी आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीसाठी पीडित तरुणीला बोलावले. रात्री उशिरा पार्टी संपली. तू एकटी तुझ्या घरी जाऊ नको, रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा, असे म्हणून आरोपीने फिर्यादी तरुणीला त्याच्या भुमकर चौक येथील घरी थांबवून घेतले. त्यानंतर फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले. तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण करणारे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे.