सांगलीत मेंढ्यांना लाखोंचा भाव

सांगली : एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखाहून अधिक किमत मिळू शकते हे कुणालाही पटणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बाजारात मेंढीला दोन लाख 33 हजाराला विकली गेली आहे.

त्यामुळे आनंदीत झालेल्या शेतकऱ्याने मेंढीची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढली आणि आनंद साजरा केला. जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याची सहा मेंढ्याची तब्बल 14 लाखांला विक्री करण्यात आली. मेंढ्यांना लाखो रुपयात भाव मिळाल्याने गावात मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळमधील मेंढीची चांगले रुबाबदार नाक, विशिष्ट चव आणि स्वाद असलेले मांस प्रसिद्ध आहे.त्यामुळे माडग्याळ मेंढीची दर वाढलेले आहेत. माळ रानावर आणि दुष्काळी भागात कमीत कमी चारा खाऊन शेतकऱ्याला चांगला भाव मेंढी मिळवून देत आहे. तर माडग्याळचा बाजार प्रसिद्ध आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात मेंढी विक्रीस येत आहेत आणि विक्री ही होत आहे आणि मागणी ही वाढू लागली आहे. महाराष्ट्रात मेंढ्यांच्या दख्खनी व माडग्याळ या दोनच प्रमुख जाती आढळतात.

दख्खनच्या पठारावर आढळत असल्याने दख्खनी मेंढी हे नाव पडले. संगमनेरी, लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी या दख्खनी मेंढींच्या चार उपजाती आहेत. दख्खनी मेंढी उष्ण हवामानात, कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात पाळण्यास उपयुक्त असून मांस व लोकर उत्पादनासाठी पाळतात.माडग्याळ मेंढय़ा सांगली जिल्ह्यातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, माडग्याळ आणि सिद्धनाथ या भागात जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच या मेंढ्यांना हे नाव पडले.जत तालुक्यातील माडग्याळचा शेळी-मेंढीचा शुक्रवारचा तर जतचा गुरूवारचा आठवडी बाजार प्रसिद्ध आहे. त्यामध्ये माडग्याळी मेंढ्या विक्रीला येतात.