कोल्हापूर: राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त (25 जानेवारी रोजी) कोल्हापुरातील हॉटेल मालक संघातर्फे जिल्ह्यातील सर्व पर्यटकांना राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
सर्व हॉटेल चालकांतर्फे राष्ट्रीय पर्यटन दिनाचा फलक लावून पर्यटकांचे स्वागत फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हॉटेल मालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. या उपक्रमामुळे आपल्या कोल्हापूरची आतिथ्यशील परंपरा जोपासली जाईल व इथली संस्कृती सर्वदूर पोहोचेल, असेही जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त टाक ( ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर) संस्थेमार्फत विमानतळ, रेल्वे स्टेशन वर येणाऱ्या प्रवाशांचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. हा उपक्रम दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिनी राबविण्यात येणार असल्याची माहिती टाक संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.