नगर : महाराष्ट्रातील ४७ सहकारी साखर कारखाने खासगी व्यक्तींनी कवडीमोल भावाने, संगनमताने विकत घेऊन सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून केली आहे.
एवढय़ा व्यापक व गंभीर घोटाळय़ाबाबत राज्य सरकार काहीच कारवाई करत नसेल तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पारदर्शक व चांगले क्षेत्र सहकार क्षेत्र बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रथमच स्वतंत्र सहकार विभाग निर्माण केला आहे, असे वाटते त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीतील घोटाळय़ाची उच्चस्तरीय चौकशी केल्यास केंद्र सरकारकडून एक चांगले उदाहरण निर्माण होईल, असेही पत्रात हजारे यांनी नमूद केले आहे.