कोल्हापूर – येथील अंबाबाई मंदिर परिसरात आज सकाळी भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांसह, व्यवस्थापन समितीतील उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
ई-पास काढण्यासाठीच्या रांगेत उभे राहण्यावरून हा वाद झाला असल्याची माहिती मिळाली आहे. महिला आणि पुरुष भाविकांमध्ये झटापट झाली आहे. हा वाद इतका टोकाला गेला की भाविकांनी एकमेकांना चप्पल आणि खुर्ची फेकून मारल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झटापट करणारे भाविक जालना येथून अंबाबाई दर्शनासाठी आले होते. अचानक ई-पाससाठी असलेल्या रांगेत उभे राहण्यावरून भाविकांमध्ये बाचाबाची सुरु झाली. काही क्षणात पुरुष आणि महिला भाविकांमध्ये वादला सुरुवात झाली. त्यांची हा वाद एकमेकांना चप्पल आणि खुर्ची फेकून मारण्यापर्यंत गेला. दरम्यान काही काळासाठी व्यवस्थापन समितीसह अनेकांची तारांबळ उडाली. काही काळासाठी मंदिर परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपाने भाविकांचा वाद नियंत्रणात आला.