जवाहर साखर कारखान्यावर ऊस तोड मजूरांचे लसीकरण

इचलकरंजी: -हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे सन 2021-22 या 29 व्या ऊस गाळप हंगामामध्ये ऊस तोडणी व वाहतुकीसाठी परजिल्ह्यातून व राज्यातून कंत्राटदारांमार्फत आलेल्या मजूर, मुकादम, वाहतुकदार तसेच हंगाम कालावधित कारखान्याकडे आलेले हमाल, बगॅस कामाचे मजूर अशा इतर कंत्राटी कामांचे मजूर आणि त्यांचे कुटुंबियांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली.

कारखाना व्यवस्थापनाने ऊस तोडणी मजूरांच्या आरोग्याबाबत खबरदारी म्हणून ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार तसेच इतर कंत्राटी मजूर आणि त्यांचे कुटुंबियांपैकी ज्यांनी दोन्ही डोस पूर्ण केलेले नाहीत त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, हुपरी यांच्या सहकार्याने लस दिली जात आहे. त्याचबरोबर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन डोस पूर्ण होवून 9 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्यांना बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया कारखाना कार्यस्थळावर सुरू करण्यात आली. त्यास मजूरांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कारखान्याच्या यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरूवातीस यापूर्वी दोनवेळा अशी कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात आलेली आहे.यावेळी हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. प्रियांका जाधव, डॉ. सौ. वसुंधरा देशमुख, आरोग्य सहाय्यक श्री. चिखले आणि आरोग्य केंद्राचा स्टाफ तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री आण्णासाहेब गोटखिंडे, सुुरज बेडगे, मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश माने आणि कारखान्याच्या शेती व वैद्यकीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.