अखेर मानसिंग बोंद्रे याला अटक

कोल्हापूर : शालीनी पॅलेस नजीक घराजवळ रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेला संशयित मानसिंग बोंद्रे याला आंबा घाटात पोलिसांनी अटक केली. काल, शुक्रवारी मध्यरात्री जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली.गेल्या महिन्यात मानसिंग विजय बोंद्रे याने रंकाळा परिसरात फिल्मी स्टाईल गोळीबार केला होता.

यामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली होती. दसरा चौकातील श्री. शाहु छत्रपती शिक्षण संस्था आणि शेत जमिनीच्या वादातून त्यांने हा गोळीबार केल्याचे समोर आले होते.याबाबत त्याचा चुलत सावत्रबंधू अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (रा. शालीनी पॅलेसनजीक) यांनी मानसिंगने आपल्यावर गोळीबार केल्याची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी मानसिंग बोंद्रे याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्या घटनेनंतर संशयित मानसिंग बोंद्रे पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यांने अटकपुर्व जामीनासाठी प्रयत्न केले मात्र जिल्हा न्यायालयाने व उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. तो शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर होणार अशी चर्चा सुरु होती. संध्याकाळपर्यंत तो हजर झाला नव्हता. शुक्रवारी मध्यरात्री त्याला आंबा घाटात पोलिसांनी अटक केली.