खाजगी बसेसच्या शुल्कावर नियंत्रण ठेवा- मराठी एकीकरण समिती

इचलकरंजी: सध्या महाराष्ट्रात एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे बस सेवा अनियमित सुरु आहे त्यामुळे सामान्य नागरिकांची पर्यायाने प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. सामान्य लोकांची लालपरी बंद असल्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडयांवर नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे.

बहुतांश सामान्य लोकांच्या कडे स्वतःची दुचाकी चारचाकी गाडी नसल्यामुळे जनतेला खाजगी ट्रॅव्हल बसेसशिवाय पर्यायच नाही.याचाच गैरफायदा घेऊन अव्वाच्या सव्वा प्रवासी भाडे घेऊन जनतेची लूट करत आहेत. याचा त्रास लांब पल्ल्या च्या प्रवासा सोबत छोट्या पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही होत आहे. एस.टी. संपामुळे आधीच गाड्या वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासा सोबत आर्थिक भुर्दंड ही नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत लक्ष्य घालून अश्या अव्वाच्या सव्वा प्रवासी भाडे घेणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हलस वर योग्य ती कारवाई करून योग्य प्रवाशी भाडे घेण्या बाबत सूचना दयावी व सामान्य प्रवासी नागरिकांची होणारी लूट थांबवावी असे निवेदन मराठी एकीकरण समिती तर्फे इचलकरंजीचे शहर वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विकास अडसूळ यांना देण्यात आले .अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनात अमित दादासो कुंभार, रोहित घाडगे ,चंद्रकांत ठिपकुर्ले, प्रवीण आर्डे, बाळकृष्ण धुपदाळे, प्रशांत जाधव, रामसागर पोटे, राजेश व्यास, विश्वनाथ व्हनबट्टे उपस्थित होते.