कोल्हापूर – कोरोना काळात उद्योगधंद्यांचे होणारे नुकसान आणि त्याकारणाने वाढत असलेली बेरोजगारी यावर उद्योजगतानिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबन हे उपाय असून अशा काळात जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांना स्वच्छ दुधनिर्मिती आणि प्रक्रिया उद्योग यावर लक्ष केंद्रित केल्यास स्वयंरोजगारासह उत्पन्न वाढीच्या प्रचंड संधी असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. दत्ताजी उगले यांनी केले.
ते काल राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने अनुसूचित जातीप्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आयोजित दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातीलअनुकूल नैसर्गिक परिस्थिती व सहकाराचे विणलेले घट्ट जाळे यामुळे दुग्धव्यवसायास पोषक वातावरण असून शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाबरोबरच दूध प्रक्रिया समजून घेऊन प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री केल्यास त्यांना नक्कीच उत्पन्नवाढीच्या संधी मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले यांनी महाविद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराबरोबरच दुग्धजन्य पदार्थ निर्मितीच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन कार्य सतत चालू असून महाविद्यालयाने त्यातून पेटंटही मिळविले आहे, हे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहचविण्याचे काम प्रशिक्षण वर्गामार्फत नियमित चालू असून अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचे काम सुरू असल्याचे व त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन केले.
अनुसूचित जातीप्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी खास आयोजित या प्रशिक्षण शिबिरामध्ये दुग्धशास्त्र व पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. एस. टी. पाचपुते, डॉ. एस. एस. कांबळे, डॉ. डी. डी. पतंगे, प्रा. सी. व्ही. मेमाणे यांनी प्रशिक्षणार्थींना स्वच्छ दूध निर्मितीसह सुगंधी दूध,बासुंदी, फ्रुटखंड, दही,लस्सी, चक्का, लोणी, तूप तसेच रसगुल्ला व पनीर बनविण्याचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ अनुसूचित जातीप्रवर्गातील वीस शेतकऱ्यांनी घेतला.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस.टी. पाचपुते यांनी,सूत्रसंचालन डॉ.डी.डी. पतंगे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. एस.एस.कांबळे यांनी केले.