कोल्हापुर : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. यशस्वी पाठपुरावा करून निधी मंजुर केला जात आहे. असे असताना मिळालेल्या निधीतून विकास कामे तातडीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण होते, अशाने कोल्हापूर शहराचा विकास अधिकच खुंटणार असून, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी कामाची क्षमता वाढवावी. मंजूर झालेले प्रकल्प पूर्ण करण्याकरिता प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजनासाठी व देखरेखीसाठी स्वतंत्र प्रभारी प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत, अशा सुचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास विविध योजना व प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात कोल्हापूर महानगरपालिका येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्ग असणाऱ्या आखरी रास्ताचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. आपल्या व माजी नगरसेवक श्री.नंदकुमार मोरे यांच्या पाठपुराव्याने या रस्त्याचे अर्धे काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित रस्त्याचे काम आमदार निधीतून प्रस्तावित होणार होते. परंतु, आमदार कै.चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या उर्वरित रस्त्याच्या कामाची प्रक्रिया पार पडलेली नाही. त्यामुळे हा रस्ता अपूर्णच राहिला असून, भागातील नागरिकांना खड्यांचा आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उर्वरित रस्त्याचे काम महानगरपालिका प्रशासनाने स्वनिधीतून तात्काळ करावे, अशा सूचना दिल्या. यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व क्रीडा संकुलाचा आराखडा तयार असून, याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून रु.५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित रु.१० कोटी निधीस लवकरच नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून मंजुरी मिळेल. पण, या प्रकल्पाचेही काम आजतागायत कागदोपत्रीच असल्याचे दिसते. त्यामुळे तात्काळ मंजुर निधी मधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरु करावे, अशा सूचना दिल्या. ऐतिहासिक रंकाळा तलावास रु.१५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यातील रु.१० कोटी निधीस १०० % अनुदानासह नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. परंतु, या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या नसून, निधी असूनही विकास कामे थांबल्याचे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने रंकाळा तलाव सुशोभिकरण आणि संवर्धन आराखड्यानुसार कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान नियोजनेअंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांना रु.२०३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, त्याचाही प्रस्तावही प्रशासनाकडून सादर करण्यात आलेला नाही, याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी विचारणा केली. यावर बोलताना आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी, या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस ३० टक्के स्वहिस्सा द्यावा लागणार असून, महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याचे सांगितले. यावर बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, या योजनेअंतर्गत “ड” वर्ग महानगरपालिकांना ३० टक्के स्वहिस्सा देणे अनिवार्य असून, त्याशिवाय ठोक निधीची तरतूद शासनाकडून केली जात नसल्याचे सांगितले. याकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने स्वहिश्याचा निधी भरण्याकरिता राष्ट्रीयीकृत बँक तसेच “हुडको”, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कंपनी मर्यादित व शासनमान्य वित्तीय संस्थाकडून वित्तीय सहाय्य घेण्यात यावे. यातून महानगरपालिका स्वहिश्याची रक्कम उभारू शकते. याकरिता कमी व्याजदर आकाराला जात असून, त्यास परतावा मिळतो. त्यामुळे अशा माध्यमातून महापालिकेने स्वहिश्याची रक्कम उभी करून, तातडीने प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशा सूचना दिल्या. यासह शहरातील गांधी मैदानाचा प्रश्न जशास तसे राहिला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात गांधी मैदानात साठलेले पाणी नागरिकांच्या घरात शिरून नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गांधी मैदानात साठणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा, याकरिता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आराखडा तयार करून, गांधी मैदानाचे काम नगरोत्थानच्या निधीमधून मार्गी लावावे. एकूणच कोल्हापूर महानगरपालिकेस शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आम्हाला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागते, परंतु, निधी मंजूर असूनही प्रस्ताव, आराखडे, निविदा अशा कामात दिरंगाई झाल्याने निधी परत जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मंजूर झालेल्या निधीच्या नियोजनासाठी आणि प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रत्येक प्रकल्पावर प्रभारी प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत, जेणेकरून कामाचा आढावा घेणे शक्य होवून, कामे वेळेत पूर्ण करणे सोपस्कर ठरेल, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या. यावेळी बोलताना आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी, झालेल्या चर्चेनुसार सर्वच गोष्टींकडे महानगरपालिका प्रशासन सकारात्मक असून, येत्या काळात प्रलंबित कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगेल, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाटगे, निलेश हंकारे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, संजय सरनाईक यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.