महाबळेश्वरमध्ये पारा शून्य अंशांवर……

महाबळेश्वर: राज्याच्या बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम आहे. त्यातच राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये तर पारा शून्य अंशांवर पोहचलाय. शुक्रवारी पहाटे महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव आणि लिंगमळा भागामध्ये तापमान शून्य अंशांपर्यंत खाली आल्याचं पहायला मिळालं.

पुढील दोन दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याने या काळात थंडीचा कडाका कायम राहील. त्यानंतर मात्र किमान तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारी महाबळेश्वरमध्ये दिवसाचे तापमान सर्वात कमी १९ अंश सेल्सिअस होते.विदर्भात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर तेथे हवामान कोरडे होईल. गुजरात, मध्य प्रदेशात थंड दिवसांची स्थिती असल्याने प्रामुख्याने मुंबईसह कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही किमान तापमान सरासरीखाली येऊन थंडी वाढलीय.