अवकाळी पावसाचा फळांच्या राजाला फटका

रत्नागिरी : मोहर लागण्यापासून ते आता फळधारणा होईपर्यंत आंबा फळबागांवर अवकाळी आणि बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे.मध्यंतरी थंडीत वाढ झाल्याने चांगला मोहर बहरला होता पण सध्याचा पाऊस आणि अधिकचा वाढलेला गारवा यामुळे पुन्हा मोहर लागडत आहे तरदेखील या बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळीनंतर आता कुठे फळबागा सावरु लागल्या होत्या. मात्र, आंबा पिकाचं शुक्लकाष्ठ काही संपलेलं नाही हंगामाच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका हापूस आंब्याला बसलाय. याचा परिणाम आता थेट उत्पादनावर होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा 40 टक्के उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.कोकणातील आंबा फळाचे वेगळेपण आहे. फळांचा राजा असलेल्या हापूसला तर मोठ्या प्रमाणात मागणी असते शिवाय हंगामाच्या सुरवातीला मिळणाऱ्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती तर होत आहेच शिवाय कोकणातील अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम कायम राहिलेला आहे. आंब्यामुळे कोकणात अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र गेल्या काही वर्षापासून ही अर्थव्यवस्था कोलमडू लागलीय. यावर्षी देखील आंबा पिकावर वातावरणाचा परिणाम झालाय. अगोदरच लांबणीवर गेलेलं आंबा पिक आणखीन लांबणीवर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळं बागायतदार हवालदिल झाला आहेत. अडचणीत असलेल्या फळ बागायतदारांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.