पालघरमध्ये झांझरोळी धरणाला भगदाड….

पालघर: पालघर तालुक्यातील माहीम – केळवा लघुपाटबंधारे योजनेवरील केळवे रोड (झांझरोळी) येथील धरणाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या मुख्य पाणी सोडण्याच्या भिंतीच्या शीर्षक बाजूस भगदाड पडले असून त्यामधून गळती वाढली आहे. यामुळे धरणातील पाणी हळूहळू कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मात्र यामुळे लगतच्या गावकऱ्यांना सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.झांझरोली येथील धरणाच्या बाहेरच्या बाजूला १७५ ते १८९ मीटर धरणाच्या मधून पावसाळ्यात काही प्रमाणात गळती होत होती. कालव्याच्या मुख्य विमोचनकाच्या भिंतीच्या शीर्षक बाजूस गळती सुरु झाल्याबाबत पाटबंधारे विभागाला कळवण्यात आले होते. धरण सुरक्षा विभागाच्या कार्यकारी अभियंता (नाशिक) यांनी ४ जानेवारी रोजी माहीम-केळवा योजनेतील क्षेत्रीय पाहणी केली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाला धरणाचा पाणीसाठा हळूहळू कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असणाऱ्या पाण्याच्या विसर्ग मार्गाची चा व्हिडीओ काढून अभ्यास करावा, धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या भागात पाणबुड्याच्या साहाय्याने ताडपत्री लावून बंद करण्यात यावे तसेच ताडपत्री सुरक्षित राहावी म्हणून वाळूच्या गोणी व इतर उपाय योजना करावी अशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या.